कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गास कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी, कृती समितीने विरोध केल्यानंतर आता महायुतीकडून ही विरोध सुरू झाला आहे. तर आता दुसरीकडे याचे पडसाद अन्य महामार्गाच्या भूमी संपादनावरही दिसू लागले आहेत. रत्नागिरी ते हैदराबाद या महामार्गासाठी भूमी संपादनासाठी काम पोलीस बंदोबस्तात सुरू असताना सोमवारी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. उदगाव येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर , संपादीत होणा-या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.
भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतक-यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राव्दारे मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतक-यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पुर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरच्या भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणा-या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या ९४५ किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास ९०७ किलोमीटरचे संपुर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा 38 किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी.
हेही वाचा : कोल्हापुरातील इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटले; शरद पवार राष्ट्रवादीचा चार जागांवर दावा
सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक , अतिग्रे ,उदगांव या गावातील मोजणीची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे. यापुर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे २००८ साली भुसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतक-यांची संपु्र्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत.
हेही वाचा : स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्यांची लूट करण्यासाठी; कोल्हापुरात ‘आप’चा आरोप
शासनाने रत्नागिरी ते नागपूर पर्यंत जो मोबदल्याचा दर रेडीरेकनरच्या अथवा बाजारभावाच्या चौपटीने शेतक-यांना दिला आहे तोच दर या शेतक-यांना दिल्यास शेतकरी भुसंपादनास कोणताही विरोध करणार नाहीत. एकाच जिल्ह्यातील एका शेतक-यास दुप्पट व एका शेतक-यास चौपटीने दर देवून प्रशासनाच्या चुकीचे खापर शेतक-यांचे माथी मारले जात आहे. तसेच उमळवाड येथून अंकली रस्त्यापर्यंत जाणारा महामार्ग हा भरावाचा न करता पिलरचा करावा लागणार असून अन्यथा सांगली शहरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३५ हून अधिक गावांना पुराचा फटका बसणार आहे, या समस्येकडे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.