कोल्हापूर : एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचलणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासन निर्णयात शुद्धिपत्रक झाल्याने योजनेतील जाचक निकष शिथिल केले असल्याने जिल्ह्यातील १४ हजार ८०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ७५ कोटी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
हेही वाचा >>> कोल्हापुरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावर ‘आप’चे आसूड आंदोलन
प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक निकषांमुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते. गेल्यावर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव संमत करून तो शासनास पाठवण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने पिक कर्ज वितरणातील जाचक निकषांमध्ये शिथिलता आणणारे शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.