कोल्हापूर : इचलकरंजीतील एका नगरसेविकेने पतीविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. पतीने स्वत:च्याच १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
इचलकरंजीतील नगरसेविकेचा प्रेमविवाह झाला आहे. संबंधित नगरसेविकेचा पतीही राजकारणात सक्रीय आहे.
शुक्रवारी महिलेने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत पतीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून तिला अश्लील चित्रफीत दाखवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
महिलेला दहा वर्षांची मुलगी तसेच सात वर्षांचा मुलगा आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे, की तीन वर्षांपूर्वी मुलीने मला, बाबा अत्याचार करत असल्याचे सांगितले होते. मी पतीला याबाबत जाबही विचारला होता. मात्र, त्या वेळी त्यांनी मला धमकावले. यानंतरही पतीने माझ्यावर आणि मुलीवरही अत्याचार सुरूच ठेवले आहे. नराधम पती स्वत:च्या मुलीला टीव्हीवरील ‘ क्राइम शो’मधील बलात्काराचे दृश्य आणि यूटय़ूबवरील अश्लील चित्रफीत दाखवायचा, असा आरोपही महिलेने केला आहे.