कोल्हापूर : पैठणी साडी, हिमरू शाल, करवतकाठी साडी, घोंगडी, खणासारखे पारंपरिक वस्त्र विणणाऱ्या विणकरांना मदतीचा हात आणि त्यातून या परंपरेचे जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील या पाच प्रमुख पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना राज्य शासनाच्या वतीने आता ‘उत्सव भत्ता’ दिला जाणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने यासाठी निर्णय घेतला आहे. यामध्ये पुरुष विणकरांना १० हजार, तर महिलांना दीडपट अधिक म्हणजे १५ हजार रुपये इतका भत्ता मिळणार आहे. यासाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निर्णयामुळे उतारवयात विणकरांच्या जीवनात आशेचा धागा जोडला जाणार असून, राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योगाचे जतन, संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाच्या २०२३-२८ या पंचवार्षिक वस्त्रोद्योग धोरणांतर्गत पारंपरिक वस्त्रोद्योग अतिरिक्त प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता देण्याचे शासनाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ठरले होते. यापूर्वी प्रायोगिक तत्वावर काहींना अशी मदत करण्यात आली. आता या योजनेचे स्वरूप व्यापक करत ती राज्यभर राबवली जाणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यास अनुसरून आता राज्यातील पैठणी साडी, हिमरू शाल, करवतकाठी साडी, घोंगडी व खण फॅब्रिक्स या पाच पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकारांना प्रतिपुरुष १० हजार रुपये उत्सव भत्ता देणार आहे. महिला विणकरांना हा भत्ता आणखी पाच हजार रुपयांनी वाढवून दिला जाणार आहे.

आणखी वाचा-चौपट भरपाई दिल्यावरच रत्नागिरी – नागपूर महामार्ग, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा

वस्त्रोद्योग आयुक्तालयाकड़े जबाबदारी

याकरिता राज्य शासनाने ७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यांपैकी ६० टक्के म्हणजे २ कोटी १९ लाख रुपयांचा निधी आज वस्त्रोद्योग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सहायक संचालक, वस्त्रोद्योग आयुक्तालय यांना निधी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून, तर वस्त्रोद्योग आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उत्सव निधी विणकारांच्या खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे.

स्वागत आणि अपेक्षा

दरम्यान, शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील वस्त्रोद्योग विणकारांनी स्वागत केले आहे. मात्र, यामध्ये पात्र लाभार्थी निवडताना दक्षता घेतली जावी, अशी अपेक्षाही कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे. आजवर शासनाच्या वस्त्रोद्योगविषयक अनेक योजना आल्या; पण पारंपरिक विणकारांच्या कौशल्याची शासनाने दखल घेतल्याबद्दल या कारागिरांकडून याचे स्वागत होत आहे.

आणखी वाचा-C P Radhakrishnan : “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव वेगळं असतं”, सी.पी.राधाकृष्णन यांचं विधान

पारंपरिक वस्त्र

  • पैठणी साडी
  • हिमरू शाल
  • करवतकाठी साडी
  • घोंगडी
  • खण

विणकारांच्या कौशल्यामुळे पैठणी साडीचा लौकिक देश-परदेशात पोहोचला आहे. अलीकडे या व्यवसायामध्ये अन्य व्यावसायिक आले आहेत. पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांवर हे एक प्रकारचे अतिक्रमण आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक विणकारांना उत्सव भत्ता देऊन सन्मान करणे स्वागतार्ह आहे. परंतु यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करताना पारदर्शकता राखावी. या व्यवसायात पिढ्यान् पिढ्या कारागिरी केलेल्यांचा शोध घ्यावा. या योजनेतून पारंपरिक वस्त्रोद्योगाचे संवर्धन होईल. -कल्पेश साळवे, पैठणी विणकर, येवला

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival allowance of rs 10 thousand for men and rs 15 thousand for women weavers in state mrj