कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी सचिव, चित्रपट लेखक, दिग्दर्शक सुभाष भुरके यांचे शनिवारी वयाच्या ८७ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व सून नातवंडे असा परिवार आहे.
भुरके यांनी ‘नवरा म्हणू नये आपला’ या दिनकर द. पाटील दिग्दर्शित चित्रपटाद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट व्यवसायात पदार्पण केले. नंतर राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले आहे. १९७६ च्या सोयरिक या चित्रपटापासून स्वतंत्र दिग्दर्शन केले. त्यानंतर सौभाग्य, गाव नंबर एक, या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. कथा पटकथा संवाद, लघुपट, सिने पत्रकार म्हणून काम त्यांनी केले.
मराठी चित्रपट महामंडळाच्या स्थापनेपासूनचा कार्यकर्ता, उपाध्यक्ष व कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले. शालिनी सिनेटोन, जय प्रभा स्टुडिओच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. चित्रपट महामंडळातर्फे त्यांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.