पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयेपर्यंतचे विनातारण कर्ज घेण्यासाठी २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या काळात राष्ट्रीयाकृत बँकांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून इचलकरंजीतील फेरीवाले, लघु उद्योजक, स्वयंरोजगार, व्यवसाय करणारे व विविध उत्पादन करु इच्छिणारे सुशिक्षित बेरोजगारांनी कर्जासाठी अर्ज करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.
मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड (मुद्रा) ची स्थापना भारत सरकारने केली असून ही संस्था लघु व सूक्ष्म, उद्योगांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना वित्त उपलब्ध करुन देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरूण – तरूणी तसेच भांडवलांच्या प्रतीक्षेत असलेले लघु उद्योजक यांना रू. ५० हजार ते १० लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीयीकृत बँकांना सुमारे २० हजार कोटी रूपये प्रदान केले आहेत.
या योजनेअंतर्गत तीन प्रकारचे कर्ज देण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘शिशु’ योजनेत ५० हजार पर्यंत, ‘किशोर’ योजनेत ५० हजार ते ५ लाखापर्यंत, तर ‘तरूण’ योजनेत ५ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज प्रदान करण्यात येणार आहे. या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) आकारले जाणार नाही. तसेच कर्ज परत फेडीची मुदत ५ वर्षांपर्यंत आहे.
योजनेतील कर्जाचा अर्जाचा नमुना आमदार सुरेश हाळवणकर जनसंपर्क कार्यालय व भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे उपलब्ध आहे. ते अर्ज भरून बँकेमध्ये सादर करावयाचे आहेत.सदर कर्ज योजना ही अधिनियमित करण्यात आली असल्यामुळे पात्र अर्जदारास बँकांना कर्ज नाकारण्याचा अधिकार नाही. तसेच कर्ज नाकारायचे झाल्यास त्यांना त्यांच्या हेड ऑफिसला ठोस कारणासह कळवावे लागणार आहे. तसेच अर्जदारांची अडवणूक करण्यात येत असेल तर आमदार सुरेश हाळवणकर जनसंपर्क कार्यालय हेल्प लाईनवर (०४०७१०१५१५५) संपर्क साधावा, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.

Story img Loader