राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्य़ातील ४ धरणे भरण्याच्या मार्गावर

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पंचगंगा, कडवी या नद्या दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडल्या असून पुन्हा पूरस्थितीची चिन्हे आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी पाच फुटांनी वाढली. राधानगरीसह ४ धरणे भरण्याच्या मार्गावर असून १० बंधारे पाण्याखाली गेले .

पावसाचा जोर पाणलोट क्षेत्रात वाढत चालला असल्याने पंचगंगेची पातळी झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे राजाराम बंधाऱ्यात दिवसभरात आठ फुटांनी वाढ झाली. सकाळी २३ फूट असलेल्या पाणीपातळीत पाच फुटांनी वाढ झाली. पाण्याची गती वाढल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले . पुराचा धोका निर्माण झाल्याने आपत्ती निवारण विभाग सतर्क झाला आहे.

गेल्या २४ तासात चंदगड तालुक्यात सर्वाधित ११३.५० मि.मी. पावसाची नोंद  झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये असा- करवीर ३५.२७, कागल ३४.२१, पन्हाळा ७५.००, शाहुवाडी ६३.०० हातकणंगले २२.२५, शिरोळ १६.७१, राधानगरी ४८.३३, गगणबावडा ८०.५०, भूदरगड ५९.८०, गडिहग्लज ३२.७१, आजरा ४०.०० व चंदगड ११३.५० अशी एकूण ६२१.२८ मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी, कासारी, कुंभी, चित्री ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणातून विसर्ग सुरू केला असल्याने धरणे एकदोन दिवसात पूर्णपणे भरतील असे चित्र आहे. कडवी धरण यापूर्वीच भरले आहे. धरणातील साठा याप्रमाणे – राधानगरी  – ७.९९ (८.३६ टी.एम.सी), तुळशी २.२५ (३.४७ टी.एम.सी), वारणा २८.४६ (३४.३९ टी.एम.सी), दुधगंगा १४.५३ (२५.३९ टी.एम.सी), कासारी २.७३ (२.७७ टी.एम.सी), कडवी २.५१ (२.५१ टी.एम.सी), कुंभी २.४९ (२.७१ टी.एम.सी), पाटगाव २.४४ टी.एम.सी (३.७१ टी.एम.सी), चिकोत्रा ०.४८ (१.५२ टी.एम.सी), चित्री १.११ (१.८८ टी.एम.सी), जंगमहट्टी ०.८५ (१.२२ टी.एम.सी), घटप्रभा १.५४ (१.५४ टी.एम.सी), जांबरे ०.८१ (०.८२ टी.एम.सी) आणि कोदे ल. पा. ०.२१ (०.२१ टी.एम.सी) इतकी आहे.

Story img Loader