मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये वास्तुशांतीच्या जेवणातून ७२ जणांना विषबाधा झाली. यापैकी ५८ रुग्णांवर अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. विषबाधा झालेल्या जेवणातील अन्नपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच गुन्हे दाखल करण्यात येतील असे उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
भोसे येथील बाळासाहेब माळकर यांच्याकडे वास्तुशांतीनिमित्त काल जेवणाचा कार्यक्रम होता. हे जेवण झाल्यावर अनेकांना जुलाब उलटीचा त्रास होऊ लागला. काहींनी स्थानिक पातळीवर औषधे घेतली. मात्र हा त्रास आणि रुग्णांची संख्या वाढत गेल्यावर सामूहिक विषबाधेची घटना समोर आली. याबाबत प्रशासनाने तातडीने हालचाल करत रुग्णांना मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविले. रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या वाढतच होती.
रुग्णालयात जागा मिळेल तिथे रुग्णांना झोपवून सलाईन लावण्यात आले. आज दिवसभर या रुग्णांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून सायंकाळपासून काही रुग्णांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता हेल्रेकर यांनी सांगितले. मध्यरात्री दीड वाजता खासदार संजयकाका पाटील यांनी रुग्णालयास भेट देऊन विचारपूस केली.
रुग्णांना तातडीने उपचार करण्यात रुग्णालयाचे कर्मचारी व पोलीस मित्रांची चांगली मदत झाल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. जेवणातील अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आले असून विषबाधा कशामुळे झाली याची तपासणी करण्यासाठी हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. अहवाल प्राप्त होताच गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.