कोल्हापूर : कोल्हापूरकरांची पिण्याच्या पाण्याची वनवन संपण्याची चिन्हे नाहीत. शिंगणापूर योजनेला गळती लागली असल्याने शहराचा पाणी पुरवठा सोमवारी बंद राहिला. तो उद्याही सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात कोल्हापूरकरांनी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
कोल्हापूर शहराला पाण्याचे वरदान लाभले असले तरी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ वारंवार येते. बालिंगा, शिंगणापूर अशा पाणी योजना आखण्यात आल्या आहेत. पण त्यापैकी एक धड असेल तर ते नगरवासियांचे नशीब. कोणत्या ना कोणत्या योजनेला गळती हि ठरलेली. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात स्थानिक नेतृत्व – प्रशासन दोघेही अपयशी ठरले असल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
गळती शोधताना दमछाक
महिन्या दोन महिन्यातून पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ निष्क्रिय प्रशासनावर येत असते. आता निमित्त ठरले आहे ते शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचे. गळती काढण्याचे काम सोमवारी दिवसभर सुरु होते. गळती हि अशी तऱ्हेवाईक कि ती असते एका ठिकाणी आणि दिसते दुसऱ्याच ठिकाणी. त्यामुळे ती शोधताना यंत्रणेची पुरती दमछाक होत आहे.
पुन्हा पावसाळ्यात वनवन
आज शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली. टँकर हाच पाण्याचा एकमेव आधार ठरला आहे. तो येताच त्याभोवती नागरिकांचा गराडा पडत असून पाणी घेताना वादावादीचे प्रकार होत आहेत. मंगळवारीही यामुळे कमी दाबाने पाणी मिळणाार आहे. गतवर्षीही जुलै महिन्यातच कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बेमुदत बंद करण्याची वेळ उद्भवली होती.