जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जायच्या विधानपरिषदेच्या एका जागेचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व विद्यमान सदस्य महादेवराव महाडिक यांनी परस्परांना चिमटे काढले. पक्षाचा मीच एकटा निष्ठावंत आहे असा दावा करीत माजी आमदार पाटील यांनी आपल्या उमेदवारीचे घोडे दामटले, तर महाडिक यांनी आपण काँग्रेसचे आमदार असल्याचे नमूद करीत जास्त उमेदवारी मिळेल त्याच्या मागे राहणार असल्याचे सांगितले.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी महाडिक यांच्यासह पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दावा करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच महाडिक यांच्यादेखतच पी. एन.पाटील यांनी आपल्या पक्षनिष्ठेचे प्रदर्शन मांडले. गोकुळ दूध संघातील एका कार्यक्रमप्रसंगी पाटील यांनी आत्तापर्यंत पक्षाशी केवळ मी एकटाच प्रामाणिक राहिलो आहे. मी सोडून जिल्ह्यातील इतर सर्वावर कारवाई करावी लागेल, असा टोला त्यांनी महाडिक यांना लगावला. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे आमदार असून महाडिक हे प्रचारात नव्हते. त्यावरून पाटील यांनी महाडिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले.
पाटील यांच्या वक्तव्याला फारसा अर्थ नसल्याचे दाखवत महाडिक यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले, आपण काँग्रेसचे आमदार आहोत. विद्यमान सदस्य असल्याने पक्ष आपल्याला उमेदवारी देईल. जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहू, असे त्यांनी नमूद केले.

Story img Loader