कोल्हापूर : महायुतीचा घटक पक्ष असल्याने मी हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास पक्ष हातकणंगले, जळगाव व रायगड या तीन मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश पाटील यांनी मतदारसंघात राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या विरोधात मराठा क्रांती संघटनेच्यावतीने निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी तयारी सुरू केली आहे. याबाबत ते म्हणाले,मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. महायुतीचा घटक पक्ष या नात्याने प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार आहे. तेथून उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. पण प्रतिसाद न मिळाल्यास आमच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय पक्ष रायगड व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवणार आहे.
हेही वाचा >>>हसन मुश्रीफ,सतेज पाटील हे ऊस आंदोलन चिघळवणारे खरे सूत्रधार- राजू शेट्टी यांची टीका
‘मविआ’कडून विचारणा
दरम्यान महाविकास आघाडी कडूनही माझ्याकडे उमेदवारी निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली जात आहे. त्याचा यथावकाश विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.