कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या चार आमदारांचा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला विरोध आहे. इंडिया आघाडीने विरोध कायम ठेवला असून मुंबईत १२ मार्च रोजीच्या मोर्चा वेळी विरोधातली ताकद दिसून येईल, असे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
येत्या १२ मार्च च्या विधानसभा अधिवेशनावर मोर्चाच्या तयारीसाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची बैठक अजिंक्यतारा कार्यालय मध्ये घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विधान परिषद गट नेते सतेज पाटील होते. साठ गावच्या शेतकरी प्रतिनिधींच्या समोर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले,”रत्नागिरी नागपूर हा पर्यायी महामार्ग असताना व त्याच महामार्गावरती वाहने दुर्मिळ असताना बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा असा हा शक्तिपीठ महामार्ग शासनाने मागे घ्यावा अन्यथा बारा मार्चच्या मोर्चामध्ये बारा जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी आझाद मैदान वर सरकारला तो मागे घेण्यास भाग पाडतील. विधानसभेतून विरोधी पक्षातील आमदारांची मोट बांधून आंदोलनात समर्थन करायला लावू. शक्तिपीठ महामार्ग पूर्णतः रद्द व्हायला हवा”
संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,” प्रसार माध्यमांमध्ये विविध बातम्या पेरू व स्वतः मुख्यमंत्री हे परस्पर विरोधी विधाने करून शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण यासाठी शेतकऱ्यांची भविष्यातील पिढीची स्वप्ने शेतजमीन नष्ट होऊन धुळीस मिळवू नयेत. कोल्हापुरातून दोन हजार लोक मोर्चात सहभागी करू”माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले,” कोल्हापूरची बागायत जमीन काढून घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या भाषेत उत्तर देऊ. कागल मधून मोठ्या संख्येने मोर्चात लोक येतील” विजय देवणे म्हणाले,” शेतकऱ्यांच्या सोबत सर्वपक्षीय कार्यकर्ते शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील.”
माजी आमदार के पी पाटील म्हणाले,” केवळ शेतकरीच नव्हे तर मुंबईत राहायला गेलेले शेतकऱ्यांची पोरं व नातेवाईक देखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील”स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार म्हणाले,” स्वाभिमानी संघटनेचा या महामार्गास पूर्वीपासून विरोध आहे. आमचे आमचे राज्यातील सर्व कार्यकर्ते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सहभागी होतील.”
यावेळी दानोळीचे महादेव धनवडे, भुदरगडचे सर्जेराव देसाई, श्रमीमुक्ती दलाचे संपत देसाई, सम्राट मोरे, सुरेश संकपाळ यांनी मनोगते व्यक्त केली.गावागावात हजारो भितीपत्रके लावण्यात येणार आहेत. या भीती पत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनास पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र यड्रावकर व आमदार अशोक माने यांचे अभिनंदन करण्यात आले. विधान परिषद गटनेते आ.सतेज पाटील, संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी आमदार के पी पाटील,उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, स्वाभिमानी संघटनेचे अजित पवार, श्रमिक मुक्ती दल संपत देसाई, सम्राट मोरे, महादेव धनवडे स्टेजवर उपस्थित होते.
प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, शशिकांत पाटील,दादासो पाटील, सर्जेराव देसाई, कृष्णा पाटील, जयंत पाटील, सचिन घोरपडे, युवराज शेटे,शिवाजी पाटील, सुरेश संकपाळ, मानाजी भोसले, योगेश कुळवमोडे, नितीन मगदूम, युवराज पाटील, तानाजी भोसले,जालिंदर कुडाळकर, संग्राम वडणगेकर, साताप्पा लोंढे, जीवन पाटील, आनंदा देसाई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.