ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर
महाड येथील पूल कोसळून अनेकांना जलसमाधी मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्हयातील जुन्या, मुदत संपलेल्या, ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्य़ातील चार पुलांनी शंभरी ओलांडली असून ब्रिटिशकालीन सहा पूल अस्तित्वात असले तरी यापासून कधी आणि कितपत धोका निर्माण होईल याबाबतची भीती जनमानसात आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडून या पुलांचा अभ्यास करण्यात आलेला असून त्यांच्या अहवालानुसार या पुलांना कसलाही धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
कोल्हापूर ते रत्नागिरी जिल्ह्य़ाला जोडला जाणारा शहरातील शिवाजी पूल हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. १८७८ साली ब्रिटिशांनी पंचगंगा नदीवर या पुलाची उभारणी केली. याचे आयुष्यमान संपलेले असल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी करण्यात आल्या आहेत. त्याची दखल घेऊन पर्यायी पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या पर्यायी पुलाचे काम सुरु झाले असले तरी त्यामध्ये पुरातत्त्व विभाग, पर्यावरण यांच्या परवानग्यांकडे केलेले दुर्लक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी यामुळे हे काम बंद पडले आहे. शिवाजी पुलावरुन प्रवासी तसेच धोकादायक अवजड वाहतूक होत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला असून पर्यायी पूलही परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याने जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
इचलकरंजी संस्थानच्या ताब्यात असलेल्या आजरा या तालुक्याच्या गावी जोडला जाणारा ‘व्हिक्टोरिया ज्युबिली’ पुलाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. हिरण्यकेशी नदीवरील राष्ट्रीय व राज्य महामार्गाला जोडणाऱ्या या पुलाची आयुर्मर्यादा चार दशकापूर्वीच संपली असल्याचे ब्रिटिश शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले असले तरी अद्याप नव्या पुलाचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडला आहे. वास्तविक या पुलावरुन कमाल १८ टन क्षमतेची वाहने जाण्यास परवानगी असताना त्यावरुन सध्या ३० टन वजनाची वाहने बिनदिक्कत धावत आहेत.
वेदगंगा नदीवरील निढोरी येथील पूल तसेच भोगावती नदीवरील बािलगा येथील पुलानेही शताब्दी पार केली असून येथेही नव्या पुलाची प्रतीक्षा केली जात आहे. खेरीज वारुळ, मलकापूर, कुर येथील जुने पुलही मुदत संपलेल्या अवस्थेत असून येथेही धोकादायक वाहतूक सुरु आहे.
सर्व पूल सुस्थितीत असल्याचा दावा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मते जिल्हयातील जुने व ब्रिटिशकालीन सर्व पूल सुस्थितीत असल्याचा दावा केला जात आहे. अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे यांनी सांगितले की, जिल्हयातील सर्व पुलांचे मान्सूनपूर्व काळात ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले असता कोठेही धोका नाही. पुलाची कमान निसटणे, दगड ठिसूळ होणे, पुलांच्या जोडणीतील अंतर वाढणे आदि मुद्याधारे पाहणी करण्यात आली असता सारे व्यवस्थित असल्याचे दिसून आले आहे. अलीकडचा अनुभव लक्षात घेता पावसाळयानंतर या सर्व पुलांचे पुन्हा सविस्तर ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे.