कोल्हापूर : राज्यातील चोखंदळ ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या गोकुळने चार प्रकारचे स्वादिष्ट सुगंधीत दूध गुरुवारी ग्राहकांच्या सेवेत रुजू केले. गेल्या काही काळांपासून ग्राहकांकडून सुगंधित दुधाची (फ्लेवर मिल्क) वारंवार मागणी केली जात होती. ती लक्षात घेऊन गोकुळच्या संचालक मंडळाने २०० मि.ली. पेटजार बॉटलमध्ये सुगंधित दूध पॅकिंग करून वितरित करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गोकुळ सुगंधित दूध (फ्लेवर मिल्क) या उत्पादनाचा विक्री शुभारंभ माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ व माजी गृह राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाला.
सहा महिने टिकाऊ
सुगंधित दूध हे गोकुळच्या उच्चत्तम दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केलेले आहे. सुगंधित दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले असून उच्च दर्जाची प्रकिया केली असल्याने सामान्य तापमांनाला १८० दिवस टिकणारे आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचा वापरही वाढणार आहे, सुगंधित दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. सध्या सुगंधित दूध हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनिला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध केले असून त्याची किमत ३० रुपये आहे.