महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप ताराराणी आघाडीकडून आलेल्या नावाला बहुमताने नाकारण्याच्या निर्णयाबाबत फेर विचार करावा म्हणून आलेल्या प्रस्तावास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने पुन्हा फेटाळल्याने या विषयावर महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सभेमध्ये सत्तारूढ व विरोधकांमध्ये वाद झाला. प्रस्ताव नाकारल्याचा निषेध करीत भाजप ताराराणी आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी गेल्या सभेत पाचजणांपकी चौघांना बहुमताने मान्यता मिळाली, तर सुनील कदम या ताराराणी आघाडीच्या उमेदवारास बहुमताने नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होऊ शकली नाही. याबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नगरसचिव विभागाकडून शासनाकडे निर्देश मागविण्यात आले होते. यासाठी शासनाकडे प्रस्ताव नाकारणाऱ्या आघाडीकडून सुनील कदम यांच्यावर झालेल्या आरोपांची माहितीही पाठविण्यात आली होती. स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार सभागृहाला असल्याने या पूर्वीच्या सभेत या बाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा विषय घेण्यात आला होता.
याबाबत सुरमंजिरी लाटकर यांनी सुनील कदम यांच्यावर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे व महापालिकेच्या हिताविरुध्द तृप्ती माळवी यांना केलेले सहकार्य याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सत्यजित कदम, संभाजी जाधव यांनी आक्षेप घेतला. रुपाराणी निकम यांनी सुनील कदम यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे सांगितले. तर सुरमंजिरी लाटकर यांनी गुन्हे दाखल असल्याची प्रत सभागृहाला दाखवली यावरून दोन्ही आघाडीत ताणाताणी झाली. थोडा वेळ सभागृहात गोंधळ झाला. अजित ठाणेकर यांनी गेल्यावेळी मान्यतेसाठी घेतलेल्या मतदानाचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. संभाजी जाधव यांनी महापौर, आयुक्त हे याबाबत काहीच बोलत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
सत्तारूढ नगरसेवकांनी कदम यांच्या निवडीबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही बहुमताने त्यांना नाकारले असल्याचे सांगितले. त्यामुळे हतबल झालेल्या भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांना बहुमतानेही सुनील कदम यांची निवड होणार नसल्याचे लक्षात आले. भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
स्वीकृत नगरसेवक नावावरून कोल्हापूर महापालिकेत गोंधळ
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप ताराराणी आघाडीकडून आलेल्या नावाला बहुमताने नाकारण्याच्या निर्णयाबाबत फेर विचार करावा म्हणून आलेल्या प्रस्तावास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने पुन्हा फेटाळल्याने या विषयावर महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सभेमध्ये सत्तारूढ व विरोधकांमध्ये वाद झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-02-2016 at 01:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fussy on name of adopt corporator in kolhapur corporation