हजारो माशांचा बळी गेल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी मिरजेच्या गणेश तलावात असलेला कारंजा सुरू केला. तलावाच्या साठलेले पाण्याच्या प्रदूषणामुळे गेल्या दोन दिवसांपासून मासे मरत असून त्याचा थर पृष्ठभागावर तरंगत आहे. या प्रकाराची प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीस घेताच महापालिकेला जाग आली.
मिरजेच्या गणेश मंदिरासमोर ऐतिहासिक गणेश तलाव असून हा चोहोबाजूनी बंदिस्त आहे. या तलावात दरवर्षी सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तीचे व दुर्गामूर्तीचे विसर्जन करण्यात येते. पाच वर्षांपूर्वी या तलावातील गाळ काढण्यात आला असून त्यानंतर पाणी भरण्यात आले. मात्र या गणेश तलावाचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्याच्या केवळ घोषणाच करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही.
गेले दोन दिवस पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने मासे मरून तरंगण्याचे प्रकार घडत आहेत. हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने परिसरात दरुगधी पसरली आहे. या प्रकाराची प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने दखल घेत गुरुवारी तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. या नमुन्याच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे संकेत मंडळाने दिले आहेत.
दरम्यान, पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राहावे यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्व बाजूस कृत्रिम धबधबा आणि मध्यभागी कारंजा बसविला आहे. मात्र गेले काही महिने हा कारंजा व धबधबा बंद असल्याने पुरेसा ऑक्सिजन पाण्यात राहिलेला नसल्याने माशांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी महापालिकेने तलावातील कारंजा सुरू केला. यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य होईल असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा