कोल्हापूर : इचलकरंजी येथील संघटित गुन्हेगारी कायदा (‘मोका’)तून सुटलेल्या शाम लाखे या कुख्यात गुंडाने खंडणीसाठी जबरदस्तीने गाडीवर बसवून घरात आणून चार मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
शहापूर पोलिसांनी याप्रकरणी शाम लाखे याच्यासह त्याचे वडील, आदर्श उर्फ आद्या, माया, सुरज (सर्व रा.दत्तनगर, शहापूर) यांच्यासह ७जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी शाम लाखे व एका अल्पवयीन मुलासह पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा-‘बिद्री’च्या सभासदांचा मोर्चा; आमदार आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी
मुलांचे हात पाय धरल्याचे तर अर्धनग्न अवस्थेत लाखे याने खाली झोपवून त्या मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने केलेल्या जबरी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर (वय १९ याच्यासह चार मुले (सर्व रा.जयभीमनगर, इचलकरंजी) जखमी झाली आहेत. मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाखे याच्या घरी दत्तनगर गल्ली नं. ४ मध्ये घडली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, डुक्कर मारण्याचा कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी चार मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवत शाम लाखे याच्या दत्तनगर येथील घरी आणले. त्या मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हात पाय धरले. तर लाखे याने त्याला अर्वाच्च शिवीगाळ करत दोन्ही मांड्यांवर, हातावर, पायांच्या तळव्यांवर लोखंडी पाईपने मारहाण केली. वर्धमान चौकाकडे परत दिसायचे नाही. इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली. तसेच त्याच्याजवळील ३ हजार रुपये देण्यास भाग पाडले. यावेळी मुलांना केलेली मारहाण अमानुष होती. जिवाच्या आकांताने मुलांकडून केली जाणारी गयावयाची तमा न बाळगता लाखे याने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराबद्दल शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.