‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने करवीरनगरीत पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीचे सोमवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी पंचगगा नदीघाट, रंकाळा तलाव कुंड, राजाराम तलाव, कोटीतीर्थ, कळंबा तलाव आदी ठिकाणे गर्दीने फुलून गेला होता. महापालिका प्रशासनाच्या आवाहनानुसार मूर्ती व निर्माल्य दानला नागरिकांतून लक्षणीय प्रतिसाद लाभला.
गेल्या पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते.
महानगरपालिकेतर्फे पंचगंगा नदीघाट, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव व अन्य काही ठिकाणी गणेश विसर्जन कुंड, काहिली व निर्माल्य कुंड इ. व्यवस्था करण्यात आली. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. त्याबरोबरच श्री मूर्ती दान करूनही काही जणांनी ‘पंचगंगा बचावासाठी’ खारीचा वाटा उचलला. तर निर्माल्यही नदीत विसर्जित न करता निर्माल्यकुंभात एकत्रित करण्यात आले.
पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेनेही योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. दान केलेल्या गणेशमूर्ती महापालिकेच्या वतीने एकत्र करून इराणी खण व शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा