इचलकरंजी येथे सोडा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये पाच जण जखमी झाले. यापकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे एक दुकान आणि घराचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर घटनास्थळी काचांचा खच पडला होता. सदरचा प्रकार व्यंकटराव हायस्कूल परिसरातील अनुष्का सोडा पॉइंट या दुकानसमोर बुधवारी दुपारच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
व्यंकटराव हायस्कूल परिसरात अरुण लांडगे यांचे अनुष्का सोडा पॉइंट नावाचे सोडा दुकान आहे. दुपारच्या सुमारास प्रज्वल पोपट पाटील (वय २४, रा. जुना चंदूर रोड, पुजारी मळा) हा तीनचाकी रिक्षा (एमएच ११ टी ८८६९) मधून सोडा तयार करण्यासाठी लागणार गॅस सिलिंडर घेऊन आला होता. रिक्षातून सिलिंडर काढत असताना अचानकपणे सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये प्रज्वल याचा डावा पाय निकामी झाला तर सिलिंडर जोराने उडून शेजारी असलेल्या यश ऑप्टिकल दुकानाच्या शटरवर आदळून रस्त्यावर येऊन पडला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे रिक्षाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर रिक्षातील विविध प्रकारच्या कोल्ड्रिंकच्या बाटल्याने फुटल्याने रस्त्यावर काचांचा खच पडला होता. काचा उडाल्याने त्यामध्ये शंकर संगाप्पा गिरगांवे (वय १०), गुरुनाथ नागाप्पा आळगी (वय ९), विनोद शिवचलाप्पा सलगर (वय १३) आणि अनुष्का अरुण लांडगे (वय ९) असे चौघे जण जखमी झाले.
स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने जखमींना उपचारासाठी पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. स्फोटामुळे सिलिंडर पूर्णत फाटून त्याचे तुकडे झाले होते. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला. गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. या घटनेत सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Story img Loader