कौशल्य विकासातून प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार व स्वयंरोजगाराद्वारे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला नवी दिशा व बळकटी मिळेल, असा विश्वास  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर, दे आसरा फौंडेशन आणि आयएसटीसी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उद्योजकता विकास, पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि डिजिटल इंडिया या संदर्भात आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्यात पालकमंत्री पाटील बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकात निनाळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. सोनावणे, वाय.पी. पारगांवकर, आयएसटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. के. मेहकरकर, दे आसरा फौंडेशनचे संचालक एस. आर. जोशी, वरिष्ठ सल्लागार अनिल पाठक, विद्या प्रबोधिनीचे केंद्र संचालक उमाकांत वाघमारे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मुद्रा योजनेतून नवउद्योजकांना आवश्यकतेनुसार कर्ज उपलब्ध होऊ लागले आहे. या योजनेबरोबरच पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, कौशल्य विकास, स्टार्टअप इंडिया अशा विविध योजना ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी व्यवसाय शिक्षण विभागानेही या योजनांच्या जनजागरणाचे मेळावे मोठय़ा प्रमाणात घ्यावेत असे आवाहनी पालकमंत्री पाटील यांनी केले. नवउद्योजकांना नवीन उद्योगासाठी नवनव्या सवलती देण्याबरोबरच उद्योगासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी-कमी करण्यावर शासनाने भर दिला आहे.
विद्या प्रबोधिनीचे केंद्र संचालक उमाकांत वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  या प्रसंगी राहुल रणदिवे, राहुल जाधव, सचिन नारळे, के. के. मेहकरकर, एस.आर. जोशी, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांची भाषणे झाली.

Story img Loader