कोल्हापूर : कोल्हापूर आणि खेळ याचे एक अतूट समीकरण आहे. ताकतीचा प्रत्यय देणारी कुस्ती, चपळतेचा ठाव घेणारा फुटबॉल आणि अचूक लक्ष्य साधणारी नेमबाजी या तीन खेळांमध्ये कोल्हापूरने देशाचा लौकिक वाढवला आहे. कोल्हापूरकरांच्या क्रीडा परंपरेत कांबळवाडीसारख्या एका खेड्यातून आलेल्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरत गुलाल उधळला आहे.
कोल्हापूरचे वर्णन करताना कुस्ती हा खेळ अपरिहार्यपणे येतोच येतो. येथील बलदंड मल्लांनी देश-परदेशांतील मल्लांना धूळ चारली आहे. ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेले के. डी. माणगावे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव कोरले. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तम-ए-हिंद दादू चौगले, राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेते राम सारंग यांनी कोल्हापूरच्या कुस्तीचा लौकिक वाढवला.
आणखी वाचा-स्वप्निल कुसाळेचे पालकमंत्री, खासदार यांच्याकडून अभिनंदन; आमदार पाटलांकडून पाच लाखांचे बक्षीस
कोल्हापूरची क्रीडा परंपरेतील ताजी कर्तबगारी स्वप्नील कुसाळेच्या ऑलिम्पिक यशाने उजळून निघाली आहे. पण त्याच्याही आधी या क्रीडानगरीमध्ये अनेकांनी अचूक लक्ष साधलेले आहे. तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केल्याने नेमबाजी खेळ वलयांकित झाला. पाठोपाठ राही सरनोबतने जागतिक, आशियाई नेमबाजी स्पर्धांत पदक पटकाविले. ऑलिम्पिकमध्ये पिस्टल प्रकारात पात्रता मिळवणारी ती पहिली महिला ठरली. अनुष्का पाटील, जान्हवी पाटील, शाहू माने, नवनाथ फरताडे, राधिका बराले, संदीप तरटे, फुलचंद बांगर, अभिज्ञा पाटील यांनी प्रशिक्षक जयसिंग कुसाळे यांच्या प्रेरणेतून नेमबाजीत देशाला अभिमान वाटावा, असा लौकिक मिळवला आहे.
कोल्हापूरच्या मातीत आणि मनी मानसी रुजलेला आणखी एक खेळ म्हणजे फुटबॉल! कोल्हापूरकरांचे ‘फुटबॉलवेड’ वर्णन करणे शब्दातीत. खुद्द छत्रपती घराणे फुटबॉलवर नितांत प्रेम करणारे. छत्रपती शाहू स्टेडिअमवर फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी होणारी गर्दी स्तिमीत करणारी असते. गोवा, पुणे, मुंबई, बंगळूर, कोलकता येथील संघांत कोल्हापूरचे खेळाडू खेळले आहेत. कैलास पाटील, निखिल कदम, सुखदेव पाटील, आंतरराष्ट्रीय स्तरावर पात्रता सिद्ध केलेला अनिकेत जाधव अशा शेकडो गुणवंत फुटबॉलपटूंची खाण म्हणजे कोल्हापूर. खेरीज वीरधवल खाडे, अवनी सावंत, पूजा नायर, मंदार दिवसे यांच्यासह अनेकांनी जलतरणात कोल्हापूरची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. कुस्ती, फुटबॉल आणि नेमबाजी या तिन्ही खेळांनी कोल्हापूरकरांचे अवघे विश्व व्यापलेले आहे. आज या परंपरेत एका छोट्या खेड्यातून आलेल्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत गुलाल उधळला आहे.