कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गाय दूध दरात १ रुपया ३० पसे प्रतिलीटर व म्हैस दूध दरात १ रुपया ७० पसे प्रतिलीटर अशी दरवाढ करण्याचे निश्चित केले आहे. या दरवाढीनंतर सध्याच्या म्हैस दुधाच्या प्रतिलीटर ३३.४० रुपये या दराऐवजी ३५.१० रुपये, तर गायीच्या सध्याचा प्रतिलीटर २२.३० रुपयांऐवजी २३.६० रुपये दर होणार आहे. सदरची दरवाढ २१ जूनपासून लागू करण्यात येणार असून, याचा फायदा गोकुळच्या कार्यक्षेत्रातील पाच लाख दूध उत्पादकांना होणार आहे.
उन्हाळय़ामुळे दुधाची उपलब्धता कमी झाल्यामुळे तसेच एकूणच महागाईच्या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढविणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्येसुद्धा वाढ करण्याचा निर्णय गोकुळच्या संचालक मंडळाच्या बठकीमध्ये घेण्यात आला. दरवाढ २१ जूनपासून लागू करण्यात येणार असून, याचा फायदा गोकुळच्या कार्यक्षेत्रातील पाच लाख दूध उत्पादकांना होणार आहे. त्यामुळे भविष्यात म्हशीच्या दूध उत्पादनात वाढ होऊन गोकुळला त्याचा फायदा होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे.