गोकुळ दूध संघास म्हशीचे दूध न घालणा-या संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. तसेच संघाचे दूध संकलन २० लाख लीटर करण्याचा संकल्पही सभेत करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्क येथील संघाच्या मुख्य कार्यालय आवारात सभा पार पडली.
पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. संघाची वार्षकि उलाढाल १६३० कोटी असून भागभांडवल ३९ कोटी २७ लाख आहे. यंदा उत्पादकांना १.३० पसे जादा दर दिला आहे. संघाने वार्षकि २८ कोटी ९९ लाख दूध संकलन केले असून एक दिवशी जास्तीतजास्त १० लाख ०७ हजार लीटर संकलनाचा उच्चांक गाठला आहे. तर एका दिवसात १२ लाख ७५ हजार लीटर विक्रीचा उच्चांकही गाठला आहे. २०२०पर्यंत २० लाख लीटर दूध संकलन करण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. संघातर्फे दूध उत्पादकांना ४६ कोटी २ लाख रुपये दूध दर फरक म्हणून देण्यात आली आहे. ती ५५ लाख करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. संघातर्फे दूध उत्पादकांसाठी देण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली.
सभेत संघास शून्य लीटर दूध पुरवठा करण्यात येणाऱ्या १२० प्राथमिक दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच ज्या संस्था गायीचे दूध संघाला आणि म्हशीचे दूध व्यापाऱ्यांना घालतात त्यांचेही सभासदत्व रद्द करावे, असा ठराव सभासदांनी मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभासद भिवाजी पाटील यांनी संस्थांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगारासाठी संघाने त्यांच्या हिश्श्यात वाढ करून देण्याची मागणी केली. श्रीपाद पाटील यांनी ज्या संस्था रद्द करणार त्यांची नावे देण्याची मागणी केली. हणमंत पाटील यांनी दूध लीटरमध्ये दर फरक न देता तो दुधाच्या प्रतवारीवर द्यावा अशी मागणी केली. मात्र कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी याबाबत नकार देत ही बाब न्यायालयीन बनली आहे, तसेच दुधाच्या लीटर दरात वाढ होत असल्याने त्यानुसार फरक दिल्यास तो कमी होईल आणि विनाकारण संघाच्या कारभारावर चुकीची टीका होईल, असे सांगत त्यास नकार दिला.

Story img Loader