संचालक मंडळात मतभेदांचा इन्कार
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नेत्यांकडे राजीनामा पत्र दिले असले तरी तो अधीकृतपणे स्वीकारला जात नसल्याने संघाच्या संचालक मंडळात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी.एन. पाटील अशी फूट पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यामध्ये कसलेही तथ्य नाही. पाटील यांचा राजीनामा ४ जानेवारीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी पी.एन. पाटील यांनी शनिवारी दिली.
पाटील यांच्या राजीनाम्यासाठी ज्येष्ठ संचालकांनी नेत्यांकडे तगादा लावला होता. या पार्श्वभूमीवर संघाचे नेते महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांची संचालकांच्या उपस्थितीत बैठक होऊन पाटील यांचा राजीनामा घेण्याचे ठरले. पाटील राजीनामा देतील अशी शक्यता असताना त्यांनी आपला राजीनामा महाडिक यांच्याकडे दिला. हा राजीनामा अजूनही महाडिक यांच्याकडेच आहे.
अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, असा निरोप घेऊन महाडिक यांनी दूताकरवी पाठवला असताना पाटील यांनी मात्र एक जानेवारीला राजीनामा देणार असल्याचे सांगत राजीनाम्याकडे पाठ वळवली. त्यांनी पवित्रा बदलल्याने बंड केलेल्या १२ संचालकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
बैठकीस पी.एन. पाटील गटाचे पाच संचालक उपस्थित राहिले. महाडिक गटाचे संचालक अनुपस्थित राहिले. अखेर अध्यक्ष पाटील यांनी सभा तहकूब केली.
पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दर्शवल्याने गोकुळमध्ये एकीचे राजकारण करणाऱ्या महाडिक व पी.एन. पाटील या दोन बडय़ा नेत्यांत फूट पडल्याची चर्चा रंगली.
महाडिक — पाटील यांच्यात फूट पडल्याचा इन्कार पी.एन. पाटील यांनी केला. अशा बातम्या पेरणारा कोण आहे याचा शोध घेत आहोत. त्याच्याबाबत काय करायचे तेही ठरवले जाईल. पाटील यांचा राजीनामा घ्यायचे नक्की झाले आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची गाडी वापरण्याचेही सोडून दिले आहे. राजीनामा देण्याबाबत मागे पुढे झाले असले तरी पाटील यांचा राजीनामा ४ जानेवारीच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असे पी.एन. पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले.