शारदीय नवरात्रोत्सवाला मंगळवारी सुरुवात होत असताना करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या मागील बाजूची प्रभावळ सुवर्ण वलयांकित होणार आहे. यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवाला सुवर्णझळाळी प्राप्त झाल्याचे भाविकांना पाहायला मिळणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील पर्यावरण संतुलित राहण्यासाठी ही प्रभावळ उपयुक्त ठरणार आहे.
महालक्ष्मी मंदिरामध्ये अलीकडेच देवीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पडली. हे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागातील प्रमुख डॉ. सिंग यांनी काही सूचना केलेल्या होत्या. त्यामध्ये गाभाऱ्यामध्ये वायूविजन पुरेशा प्रमाणात होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. त्यासाठी देवीमागे असलेल्या चांदीच्या प्रभावळऐवजी सोन्याची प्रभावळ बसवली जावी, अशी शिफारस केली होती. ही बाब पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्री पूजक यांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी प्रभावळीत सोन्याचा मुलामा लावून देण्याचे मान्य केले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर येथे कारागिरी केलेले हैदराबादचे शिवकुमार रामलू व सहकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यांनी स्थानिक कारागीर गणेश चव्हाण यांच्या मदतीने पूर्वीच्या चांदीच्या प्रभावळीची डागडुजी केली. त्या प्रभावळीवर १२५ ग्रॅम सोन्याचा मुलामा दिला आहे. यामुळे १९५९ साली बसवण्यात आलेल्या चांदीच्या प्रभावळीला आता सुवर्णझळाळी मिळाली आहे. ही प्रभावळ महालक्ष्मी चरणी मंगळवारी अर्पण केली जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात देवीच्या गाभाऱ्यात सुवर्णझळाळी आलेली प्रभावळ देवीच्या भक्तांना पाहता येणार आहे. देवीची मूर्ती ३३ इंचाची असून, ही आताची प्रभावळ साडेतीन फूट लांब व तितक्याच रुंदीची आहे, असे भरत ओसवाल यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, सुवर्ण पालखीसाठी ४० किलो सोन्याची गरज असून आत्तापर्यंत ११ किलो सोने ट्रस्टकडे मिळाले आहे. त्यातील ३ किलो सोन्यातील मोच्रेल,चवरी याचे कलात्मक काम केले आहे. गुढीपाडव्यापर्यंत सुवर्ण पालखीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अरुंधती महाडिक यांनी या वेळी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा