गेल्या १७ वर्षांनंतर प्रथमच सांगलीचा सराफ बाजार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुनासुना ठरला. केंद्र शासनाने लागू केलेला एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा या मागणीसाठी सांगली-मिरजेतील सराफ व्यवसाय गेले ३९ दिवस बंद असून पाडव्याच्या मुहूर्तावर काळी गुढी उभी करून आपला निषेध नोंदविला. सुमारे १० ते १२ कोटींची उलाढाल आज ठप्प झाली असली तरी वाहन उद्योगामध्ये पाडव्याची मोठी उलाढाल झाली.
सांगलीत १९९९ मध्ये जकात वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराकडे दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचा सराफा बाजार बंद होता. त्यानंतर चालू वर्षी सराफा बाजार बंद राहिला. सराफ पेठ बंद असल्याने लग्नासाठी सोने खरेदी करता आली नाही. याशिवाय मार्च महिन्यानंतर झालेल्या आíथक उलाढालीवर नफ्यातून सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही सोने खरेदी करता आली नाही.
सराफ व्यावसायिकांनी आणि कारागीरांनी पाडव्याला सांगली व मिरजेत काळी गुढी उभी करून आपला निषेध नोंदविला. सांगलीत सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित व अन्य सराफांनी सराफ कट्टा येथे तर मिरजेत शिखरे सराफांच्या दुकानासमोर काळी गुढी उभी केली.
सोने खरेदी करता आली नसली तरी ग्राहकांनी वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी जोरदारपणे केली. दुचाकी वाहन खरेदीसह चारचाकी वाहन खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली असून यामध्ये कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. याशिवाय दूरचित्रवाणी, संगणक, शीतकपाट यांचीही खरेदी जोरात झाली.