कोल्हापूर : मुलांमध्ये चांगले विचार रुजविण्याची ताकद चांगल्या चित्रपटांमध्ये आहे. या माध्यमातून लहान मुलांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याचे काम चिल्लर पार्टी करत आहे, ही चळवळ राज्यभर पोहोचण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘पीपल’ या लघुपटाचे दिग्दर्शक गणेश चौगुले यांनी केले.
चिल्लर पार्टी आणि कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा सशक्त संदेश देणाऱ्या आणि समाजमनाला विचारप्रवृत्त करणाऱ्या ‘पीपल’ या हिंदी लघुपटाने गुरुवारी आठव्या बालचित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. दिग्दर्शक चौगुले यांच्या हस्ते बालप्रेक्षकांसमवेत सेल्फी घेत उद्घाटन केले. निवृत्त मुख्य अभियंता ए. आर. पोवार, शिवप्रभा लाड, डॉ. शशिकांत कुंभार, महापालिकेचे शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, विजय माळी, डॉ. अमोल पाटील, सुधाकर सावंत, ओंकार कांबळे, मिलिंद नाईक, मिलिंद कोपर्डेकर, अनिल काजवे, देविका बकरे उपस्थित होते. पहिल्या दिवशी डॉ. डू लिटिल, फ्लाय अवे होम हे चित्रपट पाहण्यासाठी १५०० बालप्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. परिसरात फुलपाखरांच्या प्रतिकृती टांगलेल्या होत्या.