कोल्हापूर : कोल्हापूरच्या कला, सांस्कृतिक वैभव फुलवणारे दोन महत्त्वाचे शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आले. शिवकालीन शस्त्रांचे जतन व संवर्धन करण्याच्या ४३ लाख रुपयांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे. तर, चंद्रकांत मांडरे कलासंग्रहासाठी सव्वा कोटी रुपयांच्या अधिक खर्चाच्या निविदेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा या अंतर्गत १३ राज्यसंग्रहालयातील शिवकालीन शस्त्रांचे जतन व संवर्धन करण्याचे निर्देश दिले होते.
शस्त्रसंपन्न कोल्हापूर
त्यानुसार कोल्हापूर संग्रहालय व लक्ष्मी विलास पॅलेस (राजर्षी शाहू जन्मस्थळ) या संग्रहालयातील १३१ शिवकालीन शस्त्रांचे जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज के. आर्ट कंजर्वेशन लॅबोरेटरी, कळवा ठाणे यांची एक टक्के कमी दराची म्हणजे ४३ लाख रुपयांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे.
कला वैभवात भर
सिने अभिनेते, चित्रकार चंद्रकांत मांडरे यांच्या नावाचे संग्रहालय असून त्याचे नूतनीकरण व दालनाचा विकास करण्याकरिता ओसवाल कन्स्ट्रक्शन सातारा यांनी ३ कोटी ५५ लाख रुपयांची निविदा सादर केली होती. तथापि अधिक दराचे निविदा व वस्तू सेवा कर यामधील वाढ गृहीत धरून आज राज्य शासनाने ४ कोटी ७१ लाख इतक्या रकमेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयाने कोल्हापुरातील कला वैभवात भर पडण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया विश्वस्त विश्वास काटकर यांनी व्यक्त केली.