कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाची मागणी नसताना हजारो शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा निर्णय अनाकलनीय आहे, अशी टीका खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी केली. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या जिल्हा समितीने खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यापूर्वीच शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. त्यांच्या विजयामध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचा देखील फायदा झाला आहे. समितीने शाहू महाराज छत्रपती यांच्याशी त्यांच्या कार्यालयामध्ये भेटून सविस्तर चर्चा केली. १८ जून रोजी होणाऱ्या घेरा डालो, डेरा डालो महामोर्चास खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आपला पाठिंबा आहे व मी स्वतः मोर्चाला हजर राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा – इचलकरंजी पाणी प्रश्न अहवाल देण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून टाळाटाळ; राजू शेट्टी यांचा आरोप

शाहू महाराज छत्रपती म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग करावा अशी कोणीही मागणी केलेली नसताना हजारो एकर शेती नष्ट करून अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा निर्णय अनाकलनीय आहे. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांची शेती धोरणे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानणारी होती. कोणत्याही सरकारने शाहू महाराजांच्या शेती धोरणांचा आदर्श घेतला पाहिजे.”

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. या लढाईला पाठिंबा देत असताना जनप्रतिनिधीने विधानसभेमध्ये व संसदेमध्ये या प्रश्नावर आक्रमकपणे आवाज उठवला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात अनोख्या स्वागताने पहिल्याच दिवशी शाळेतील मुले आनंदी

सम्राट मोरे म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग हा कंत्राटदारांचे व ‘एमएसआरटीसी’च्या अधिकाऱ्यांचे मंत्र्यांची संगणमत करून केलेले कारस्थान आहे”. शिवाजी मगदूम म्हणाले, “आंदोलनाने जर महायुतीचे सरकार ऐकत नसेल तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी हिसका दाखवतील.” यावेळी गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, के डी पाटील, मच्छिंद्र मुगडे, यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government decision to destroy the families of thousands of farmers when there is no demand for the shaktipeeth highway is incomprehensible mp shahu maharaj chhatrapati ssb