कोल्हापूर : मराठा समाजाची सरसकट आरक्षणाची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
आमदार पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बोलले. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बोललेले नाहीत. शासनाने प्रारूप अधिसूचना जारी केली असली तरी त्याबाबत आगामी पंधरा दिवसानंतर काय घडणार याला महत्व प्राप्त झाले आहे. प्रारूप अधिसूचनेबाबत स्पष्टता येण्यासाठी शासनाकडून खुलासा होणे गरजेचे. प्रारूप अधिसूचना आणि यातील कायद्याच्या बाजू, वस्तुस्थिती लोकांसमोर आणली गेली पाहिजे. शासनाचे नेमके धोरण कोणते आहे हे थोड्या दिवसात लोकांना कळेल.
राहुल गांधी आणि काँग्रेसने पहिल्यापासूनच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षण शंभर टक्के कसे टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
विरोधात फूट पडत असल्याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, भाजप इंडिया आघाडी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध देशाची जनता अशी असेल. नितीश कुमार यांचा फारसा परिणाम होणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहेच.