लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी चित्रपट कलाकारांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे. राज्य शासनाने स्टुडिओ ताब्यात घेण्याबाबत दोन प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेस पाठवले असल्याने या प्रश्नावरील तोडगा दृष्टीपथात आला आहे. या निर्णयाचे कलानगरीत साखर, पेढे वाटून शनिवारी स्वागत केले.

कोल्हापूरची चित्र अस्मिता म्हणून जयप्रभा स्टुडिओ ओळखला जातो. या स्टुडिओच्या जागेची विक्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्मला झाल्यानंतर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या प्रयत्नास यश आले आहे.

आणखी वाचा-नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: पोलिसांकडून एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस

नगर विकास विभागाने स्टुडिओच्या जागेबाबत दोन पर्याय कोल्हापूर महापालिकेस दिले आहेत. स्टुडिओच्या जागेच्या मोबदल्यात श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन ही जागा ताब्यात घ्यावी. तर दुसऱ्या पर्यायानुसार वारसा हक्क स्थळ जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास प्रमाणके देऊन विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) उपलब्ध करून द्यावा, असे पर्याय दिले आहेत.

कोल्हापुरात आनंद उत्सव

या निर्णयाचे जयप्रभा स्टुडिओ बचाव समितीने जल्लोषी स्वागत केले. सायंकाळी कलाकार , तंत्रज्ञ, यांनी स्टुडिओतील मारुतीचे पूजन केले. भाजी पेंढारकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. ना. धो. महानोर व नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वप्निल राजशेखर, अनंत काळे, चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर, मिलिंद अष्टेकर, उदय कुलकर्णी आदींनी या निर्णयाचे स्वागत करून हे लढायचे यशाचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. शासनाने स्टुडिओ ताब्यात घेऊन प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होईपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार करण्यात आला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governments decision to take over jayaprabha studios artists cheer in kolhapur mrj
Show comments