नार्को टेस्ट, ब्रेनमॅिपग करण्यासाठी तयारी दर्शव, त्यासाठी माफीचा साक्षीदार करून तुला २५ लाख रुपये देण्यात येतील. अन्यथा तुला फासावर लटकवले जाईलल अशा शब्दात पोलिस वर्दीतील व्यक्तीने आपणास धमकावले आहे, अशी धक्कादायक माहिती गोिवद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने शनिवारी येथे न्यायालयासमोर दिली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांनी तपासी अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चतन्य एस. यांना ५ डिसेंबरपूर्वी याबाबतचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. टी. मुसळे यांनी गायकवाड याच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.
कॉ. गोिवद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्याबाबत आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष वेधले गेले होते. गायकवाड याने आपणास काही महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर कथन करायची असल्याचे यापूर्वी सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर तो न्यायालयासमोर नेमकी कोणती माहिती देणार हे ऐकण्यासाठी शनिवारी न्यायालयात गर्दी होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. टी. मुसळे यांच्यासमोर गायकवाड याच्या अनुपस्थितीमध्ये सुनावणी झाली. तेव्हा गायकवाडचे वकील एस. वी. पटवर्धन यांनी न्यायालयाने आदेश देऊनही तुरुंग प्रशासनाने गायकवाडला आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले नाही. त्याला म्हणणे मांडण्याची संधी देऊन मुस्कटदाबी टाळावी, अशी मागणी केली. त्यावर ५ डिसेंबर रोजी गायकवाड न्यायालयात उपस्थित राहणार आहे तेव्हाच त्याची सुनावणी घेण्याचा निर्णय झाला.
यानंतर सायंकाळी पाच वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांच्यासमोर सुनावणीचे काम सुमारे ४५ मिनिटे चालले. हे काम व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू होते. त्या वेळी गायकवाड काही मुद्दे नोंदवून घेत होता. न्यायालयाने त्याला काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे काय, असे विचारल्यावर गायकवाडने होकार दिला. मात्र सरकारी अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी आक्षेप घेत त्याला पाच डिसेंबर रोजी सुनावणीसाठी पाचारण केले असताना आता पुन्हा म्हणणे मांडण्याची संधी देणे न्याय सुसंगत नसल्याचे म्हटले. तर गायकवाड याच्या वकिलांनी त्याला म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केल्यानंतर गायकवाडने सुमारे पाच मिनिटे आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले. त्या वेळी त्याने उपरोक्त प्रमाणे धक्कादायक माहिती न्यायालयासमोर दिली. तसेच ९ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर राहिलो, तेव्हा आपली मानसिक स्थिती योग्य नसल्याने सदरची माहिती न्यायालयासमोर देऊ शकलो नाही. त्यामुळे ही माहिती आता देत आहे, असे स्पष्टीकरण केले. त्यावर न्या. यादव यांनी तपासी अंमलदारांना चौकशी करून पाच डिसेंबर रोजी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
माफीचा साक्षीदार होण्यासाठी आपल्यावर पोलिसांचा दबाव
माफीचा साक्षीदार करून तुला २५ लाख रुपये देण्यात येतील. अन्यथा तुला फासावर लटकवले जाईल अशा शब्दात पोलिस वर्दीतील व्यक्तीने आपणास धमकावले आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 22-11-2015 at 02:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind pansare murder case