भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर आणि सांगली पोलीसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका संशयिताला बुधवारी अटक केली. समीर गायकवाड असे या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी त्याला सांगलीमधून ताब्यात घेतले. त्याला बुधवारी दुपारी कोल्हापूरमधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांनी त्याला १४ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कॉ. गोविंद पानसरे व उमा पानसरे या दाम्पत्यावर १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या शरीरात तीन ठिकाणी गोळ्या घुसल्या होत्या. त्यांच्यावर सुरुवातील कोल्हापूर आणि नंतर मुंबईमध्ये उपचार करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर पानसरे यांच्यावरही त्याच पद्धतीने खुनी हल्ला झाल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले होते.
कोल्हापूर पोलीस हत्या झाल्यापासून आरोपींच्या शोधात आहेत. त्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथकेही पाठविण्यात आली होती. हल्ला झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रणही तपासण्यात आले होते. मात्र, सीसीटीव्ही बसवलेली इमारत हल्ल्याच्या ठिकाणापासून १५ ते २० मीटर अंतरावर होती. सीसीटीव्ही चित्रणात पानसरे दाम्पत्य चालत गेल्याचे दिसले होते. त्यांच्यामागोमाग साधारण दोन सेकंदातच दोन बाईकस्वार या गेटवरून गेल्याचे दिसले. मात्र, यामधून पोलीसांना तपासाच्यादृष्टीने काहीच हाती लागलेले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा