कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाची सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. संशयित आरोपी समीर गायकवाड यांच्यावतीने वकील संजीव पुनाळकर यांनी खटल्याची सुनावणी कोल्हापूरऐवजी इतरत्र व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली असून त्यावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय याबाबत कोणता निर्णय घेते यावर येथे चालणाऱ्या याचिकेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
ज्येष्ठ नेते पानसरे हे सकाळी फिरायला गेले असताना त्यांचा गोळय़ा घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सांगली येथील सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आली असून सध्या तो येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. कोल्हापूर येथे पानसरे समर्थकाकडून सातत्याने होणारी आंदोलने, त्यांच्याकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका लक्षात घेता तेथील वातावरण गायकवाडसाठी असुरक्षित आहे, असे त्याचे मत बनले आहे. यावरून त्याने कोल्हापूर वगळता इतरत्र न्यायालयीन कामकाज चालावे या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये केली आहे. त्यांचे वकील संजीव कुडाळकर त्यांनी सादर केलेल्या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे सुनावणीचे काम चालवावे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच त्याचे स्पष्टीकरण होणार आहे. त्यामुळे सुनावणीचे काम २२ जानेवारी रोजी होणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान समीर गायकवाड याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील संजीव पटवर्धन यांनी आज न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. याबाबत आज कोणताही निर्णय झाला नाही. आजच्या सुनावणीवेळी सरकारी अभियोक्ता चंद्रकांत बुदले उपस्थित होते.

Story img Loader