आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचा दावा फोल ठरल्याचा प्रकार इचलकरंजीत दिसून आला. मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना मतदान केंद्र बदलाचा ८-अ हा फॉर्म उपलब्धच नसल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक विभाग हाताळणाऱ्या यंत्रणेने अशाप्रकारचे फॉर्म मतदान केंद्रावर उपलब्ध न केल्याने मतदान केंद्रात कामकाज पाहणाऱ्या शिक्षकांना मतदारांकडून विनाकारण बोलणी ऐकावी लागली. विशेष म्हणजे एक शिपाईच निवडणूक विभागाची यंत्रणा हाताळत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. निवडणूक विभागाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी नुकताच कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी आपला विभाग पुढील वर्षी मोठय़ा संख्येने होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिका यांच्या निवडणुकांसाठी दक्ष असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र, त्यांची पाठ फिरण्याचा अवकाश निवडणूक विभागातील अनागोंदी चव्हाटय़ावर आली आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये २३४ मतदान केंद्र असून त्यासाठी प्रत्येकी १ शिक्षक नियुक्त करण्यात आला आहे. मुळात उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांचा वापर करू नये, असा आदेश दिला आहे. न्यायालयाची स्थगिती असण्याने शिक्षक या कामातून आपली मान कशी काढून घेता येईल, या विचारात आहे. तथापि, अनिच्छेने शिक्षक सोमवारी मतदान केंद्रावर गेले. तेथे मतदान केंद्राचे नाव बदलण्यासाठी (स्थलांतरितांसाठी) ८-अ आणि नवीन नावनोंदणीसाठी ६-अ असे दोन फॉर्म निवडणूक विभागाने देणे अपेक्षित होते. मात्र, ८-अ या प्रकारचा फॉर्म उपलब्ध केला नसल्याने तो फॉर्म मागणीसाठी आलेल्या नागरिकांनी केंद्रावरील शिक्षकांना जबाबदार धरत बोलणी सुनावली. शिक्षकांनी कोणत्याच अर्थाने जबाबदार नसतानाही विनाकारण बोलणी खावी लागल्याने शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, फॉर्म उपलब्धतेचा गोंधळ कधी संपणार याची चिंता शिक्षक व मतदारांनाही लागली आहे.

Story img Loader