जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांचे निर्देश

संसद आदर्श ग्राम व आमदार आदर्श ग्राम योजनांसाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये सर्व स्तरांवरील कुटुंबाच्या जीवनात व राहणीमानात कायमस्वरूपी विकास घडून येण्यासाठी या ग्रामपंचायती स्थानिक विकासाचे मॉडेल म्हणून विकसित कराव्यात. परिसरातील इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठराव्यात हे या योजनांचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी महसूल, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण, रोजगार आदींशी संबंधित सर्व सुविधा कार्यान्वयी यंत्रणांनी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात व विकासकामे पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी दिले.

संसद आदर्श ग्राम योजना व आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये समाधान योजनेची शिबिरे घेऊन सर्व प्रकारच्या दाखल्यांनी गावे परिपूर्ण बनवा. आमदार आदर्श ग्राममधील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करा, अशा सूचना देऊन राज्य शासनाशी समन्वय साधून लवकरच प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सनी यांनी सांगितले.

संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या राजगोळी खुर्द, पेरीड आणि सोनवडे या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा तसेच आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमधील कामांचा आढावा घेण्यासाठी कार्यान्वय यंत्रणांची बठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार,  ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पन्हाळा उपविभागीय अधिकारी रवींद्र खाडे, गडिहग्लज उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. आदर्श ग्राम योजनेतील गावांमध्ये जन्म-मृत्यूचे शंभर टक्के नोंदणीकरण व्हावे, लसीकरण व्हावे, त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या पातळीत वाढ व्हावी व एकूणच सर्वागीण विकासाचा आलेख उंच व्हावा, यासाठी जिल्हा टेकोर नियोजन करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी या वेळी केल्या.