कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आज कोल्हापूरात उत्साही वातावरणात सुरुवात झाली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योत, नानाविध देखावे, विविध स्पर्धा, चौका चौकात लाभलेले भगवे ध्वज त्यामुळे वातावरण शिवमय झाले आहे.
दरम्यान, फुलेवाडी रिंग रोडवरील कारीआई तरुण मंडळाच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यंदा शिवजयंती निमित्त ‘मराठा स्वराज्याचे आरमार’ हा देखावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठा स्वराज्याची आरमार हा ऐतिहासिक प्रदर्शन ठेवण्यात आले असून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. सर्व शिवप्रेमी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा…कोल्हापूर : साहित्यप्रेमींना पर्वणी; शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे आजरा गावात थाटात लोकार्पण
६० फुटी जहाज
मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या देखाव्यामध्ये मराठा पद्धतीची ६ फुटी जहाज आणण्यात आली आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची प्रतिकृती असणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभा केलेल्या मराठा आरमारा विषयीची माहिती देण्यासाठी गौरवशाली मराठा आरमार – जहाज प्रतिकृती प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. ज्याचे आरमार त्याचा समुद्र ! आरमार म्हणजे हिंदवी स्वराज्याचे एक अंगच ! ह्या ‘मराठा आरमाराचा’ इतिहास प्रदर्शन रुपाने आपणासमोर आणण्यात येणार आहे.
समृद्ध इतिहासाचे दर्शन
या जहाज प्रतिकृती प्रदर्शन च्या माध्यमातून समुद्रातील किल्ले आणि जहाज बांधणी, प्राचीन सिंधू संस्कृती ते भारतीय नौदलापर्यंतचा वैभवशाली समुद्री नौकानयनाचा एक समृद्ध प्रवास मांडण्यात येणार आहे. प्राचीन भारतीय पराक्रमी राजवंश – मौर्य सम्राट, सातवाहन साम्राज्य, चोला साम्राज्य, कदंब, शिलाहार, यादव राजवंश, या प्राचीन सम्राटांचे समुद्रामध्ये हुकूमत गाजवणाऱ्या बलाढ्य आरमाराची यशोगाथा असणार आहे. यनिमित्ताने भारतीय समुद्रावर अधिराज्य गाजवणारा सुवर्णकाळ पाहता येणार आहे. इंग्रज-डच, फ्रेंच-पोर्तुगीज या दर्यावर्दी युरोपीय सत्ता आणि सिद्दी-मुघलांसारख्या सुल्तानांना ज्याचा समुद्रावर धाक होता असे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी समुद्री सीमा रक्षणासाठी निर्माण केलेल्या प्रभावी आरमारातील ( नौदलातील ) गलबत, गुराब, पाल या लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती असणार आहे.
भारतीय नौदलातील आयएनएस विशाखापट्टणम व आयएनएस विक्रांत या जहाजांच्या प्रतिकृती, भारतामध्ये सर्वात जास्त काळ सत्ता उपभोगणारे युरोपीय म्हणजे पोर्तुगीज होय.या पोर्तुगीज लोकांनी वापरलेले जहाजाच्या प्रतिकृती, भारताच्या अथांग समुद्रात ब्रिटिश आरमाराची अनेक जहाज होती. ती ब्रिटिश जहाज नक्की कशी होती. या प्रदर्शनात ती पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमी कुमार गुरव यांचे प्रदर्शन बोंद्रे नगर येथील कारीआई तरुण मंडळाच्या येथे प्रदर्शनास असणार आहे.