कोल्हापूर– कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले, ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. तर शिवाजी विद्यापीठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचे वावडे का ? यातूनच विद्यापीठाच्या नावाचे ‘लघुरूप’ होईल, अशी ‘कथानके’, पसरवली जात आहेत.
याउलट या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड-दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत. मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील, प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते.
या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत. या मोर्चात अनेक पथके सहभागी होणार असून यात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहे, असे यावेळी संयोजकांनी सांगितले.