कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एक लोकसभा आणि एक विधानसभेची जागा जिंकत तृणमूल काँग्रेसने विजयी घोडदौड कायम राखली, तर बिहार आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा अनुक्रमे राजद व काँग्रेसने जिंकली़ पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. या विजयामुळे जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.
सत्तारूढ महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक बडय़ा नेत्यांनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली होती. वादग्रस्त विधाने, आरोप-प्रत्यारोप, हिंदुत्व यावरून वातावरण तापल्याने निवडणुकीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. आघाडीच्या सूत्रानुसार जाधव यांना उमेदवारी मिळाल्यावर शिवसेनेचे मतदार कोणत्या दिशेने जाणार यावर निर्णय अवलंबून होता. मात्र, त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन केल्याचे निकालाचा कल दर्शवतो. भाजपचा पराभव झाला असला, तरी या मतदारसंघातील भाजपच्या मतांमध्ये तब्बल दुपटीने झालेली वाढ हा चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभेच्या एका जागेसह विधानसभेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला़ पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा ३,०३,२०९ इतक्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला़ २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर बाबूल सुप्रियो यांनी १ लाख ९७ हजारांच्या मताधिक्याने ही जागा जिंकली होती़ सुप्रियो यांनी भाजपसह खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली़ बाबूल सुप्रियो यांनी तृणमूलच्या उमेदवारीवर बालीगंज विधानसभा मतदारसंघात माकपच्या सायरा हलीम यांना २०,२२८ मतांनी पराभूत केल़े भाजपच्या केया घोष यांना फक्त १३,२२० मते मिळाली.
बिहारमध्ये राजदने बोचहन विधानसभेची जागा सत्ताधारी ‘एनडीए’कडून खेचून घेतली़ राजदचे उमेदवार अमर पासवान यांना ८२,११६ मते, तर भाजप उमेदवार बेबी कुमारी यांना ४५,३५३ मते मिळाली. छत्तीसगडमधील खैरगड विधानसभेची काँग्रेसने जिंकली़ काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांना ८७,८७९ मते, तर भाजपच्या कोमल जंघेल यांना ६७,७०३ मते मिळाली़ राज्यातील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या पोटनिवडणुकांत सलग चौथ्यांदा काँग्रेसने भाजपचा पराभव केला आह़े या विजयामुळे ९० जागांच्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ ७१ झाले आहे.
तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपपुढे कडवे आव्हान
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा निभाव लागणे कठीण जाते, हे पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघापासून ते कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले आह़े तीन पक्ष एकत्र लढल्याने मतांचे विभाजन होत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढविल्यास त्याचा भाजपवर निश्चितच परिणाम होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत गुलालाची उधळण करीत असा जल्लोष केला.