कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या निर्णयाच्या अधिसूचनेची प्रत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सादर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, माजी पालकमंत्री सतेज पाटील, मुश्रीफ यांचे राजकीय स्पर्धक समरजित घाटगे यांनी या निर्णयावर टीकेचा सूर लावला आहे.

कागल येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला आहे, असे नमूद करून या अधिसूचनेची प्रत त्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी आंदोलन करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्त केली.

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्ग रद्द; हसन मुश्रीफ यांची घोषणा

शेतकऱ्यांचा जल्लोष

मुश्रीफ यांनी ही घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. या निर्णयावर मंत्री मुश्रीफ यांनी म्हणाले, की शक्तिपीठ महामार्गामुळे असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. याला शेतकऱ्यांनी विरोध करत आंदोलन केल्याने हा महामार्ग रद्द होऊन या लढ्याला यश आले आहे. या कामी मंत्रिमंडळात पाठपुरावा करू शकलो याचा विशेष आनंद आहे.

विरोधकांचे टीकास्त्र

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा इतका मोठा निर्णय १५ ऑक्टोबरला झाला असताना तो आठवडाभराने घोषित का केला, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी अशा प्रकारे अशी अधिसूचना काढणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. फक्त कोल्हापूर वगळण्याचा निर्णय कसा होऊ शकतो? आचारसंहिता असताना निवडणुकीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका केली. शाहू उद्योगसमूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी, आचारसंहितेत अशा प्रकारे अधिसूचनेद्वारे शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ शकत नाही. निवडणूक झाल्यानंतर हा निर्णय बदललाही जाऊ शकतो. शासनाने काही तरी केले आहे हे दाखवण्यासाठी निवडणूक काळात दिशाभूल चालवली आहे, अशी टीका केली.