कोल्हापूर : आज दिवाळी सणातील भाऊबीज. या महत्त्वाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी कडून खर्डा भाकरी देण्यात आली. ऊस दराचा तिढा सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये व या हंगामासाठी प्रति टन साडेतीन हजार रुपये मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहे. तर संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे गेल्या आठवडाभर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आणखी वाचा-कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार
तीन दिवसापूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी दिली होती. तर आज महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांना खर्डा भाकरी दिली. याची सुरुवात कागल येथे कागल येथे पालकमंत्री आणि संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक हसन मुश्रीफ यांना खरडा भाकरी देण्यात आली. प्रश्न मार्गी लागावा अशी विनंती करण्यात आली.
दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली.
आणखी वाचा-विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; ६ जणांवर कारवाई
आंदोलक न्यायालयात
ऊस दराचा तोडगा न निघाल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविल्या प्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना जयसिंगपूर पोलिसाकडून अटक. आज जामिनासाठी न्यायालयात हजर करणार आहेत. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे , संपर्कप्रमुख भिमगोंडा पाटील यांचेसह प्रमुख कार्यकर्ते अटकेत आहेत.