इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आजवरची सर्वात मोठी मोहीम राबवताना डेक्कन मिल परिसरातील अतिक्रमणांवर गुरुवारी हातोडा घातला. अतिक्रमण हटाव मोहिमेत चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडय़ावर मोठय़ा प्रमाणात मद्याच्या बाटल्या सापडल्याने शहरात ओपनबार खुलेआम सुरू असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आजच्या या कारवाईत चायनीज गाडे, चहाच्या, पानाच्या टपऱ्या, कपडय़ांचे स्टॉल, किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे सतत गजबलेल्या या स्टेशन रोडने आज मोकळा श्वास घेतला.
इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने गत आठवडय़ापासून मोहीम हाती घेतली आहे. मुख्य रस्त्यावरील कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविण्याबरोबरच फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्यांच्या विरोधात ही मोहीम राबविली जात आहे. शहरात सर्वात जास्त अतिक्रमणचा भाग म्हणून स्टेशन रोड ओळखला जातो. आधीच अरुंद रस्ता आणि त्यात अतिक्रमणे यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे हटता हटत नव्हती. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना येता-जाता जीव मुठीत धरूनच जावे लागत असे. या भागातील फुटपाथ तर विविध प्रकारच्या स्टॉल्सनी व्यापल्यामुळे फुटपाथ कशासाठी असा सवाल उपस्थित होत होता.
गुरुवारी पथकाने डेक्कन मिल चौकापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे आणि कायमस्वरूपी ठाण मांडलेली दुकाने, स्टॉल्स काढण्यात येऊन ते जप्त करण्यात आले. या ठिकाणी चायनीज गाडय़ांच्या पिछाडीस असलेल्या संरक्षित भिंतीच्या पिछाडीस मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. दुपारपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत ही मोहीम सुरू ठेवण्यात आली.
अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी शहरात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा वाढू नये म्हणून दर महिन्याला कोणत्याही आठ दिवशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला.