कर्नल संतोष महाडिक यांना सरकारने शौर्य पदक देऊन त्यांचा सन्मान केला आहे. एखादा सन्मान मिळणे अभिमानाचे असते, मात्र आमचे बंधू कर्नल संतोष आज आमच्यात नाहीत त्यामुळे या सन्मानाचा आनंद असला तरी तो आमच्यात नाही हे दुखही आहे, अशी प्रतिक्रिया शहीद संतोष महाडिक यांचे बंधू जयवंत घोरपडे यांनी व्यक्त केली. सोमवारी दुपारी कर्नल महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्याची बातमी पोगरवाडी येथे येऊन पोचली. गावात आनंदाला दुखाची किनार होती. कर्नल महाडिक यांनी गाजवलेल्या पराक्रमाने प्रत्येकाचा उर दाटून येत होता, तर ते आपल्यात नाहीत हे शल्यही मनास टोचत होते. विद्यार्थ्यांनी सायंकाळी मशाल फेरी काढली. गावकऱ्यांनी कर्नल महाडिक यांना अभिवादन केले.
घोरपडे पुढे म्हणाले, तो धाडसी होता.त्याने कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी सामना करत बलिदान दिले. देशासाठी त्याचे बलिदान ही बाब आम्हाला अभिमानाची नक्कीच आहे, मात्र तो असता तर.हा विचारही तेवढाच प्रबळ आहे. आम्ही दुखी होऊन हा सन्मान स्वीकारणे त्यांना आवडणार नाही म्हणून परमेश्वराने आम्हाला, तसेच वीर पत्नी स्वाती वहिनींना हा पुरस्कार स्वीकारण्याचे बळ द्यावे. कर्नल महाडिक यांच्या मनातली पोगरवाडी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या मनातली पोगरवाडी निर्माण करून आम्ही त्यांना आदरांजली वाहू असे घोरपडे म्हणाले. कर्नल महाडिक यांना १७ नोव्हेंबर रोजी कुपवाडा सेक्टर येथे दहशदवाद्यांशी लढताना वीर मरण आले होते. त्यांच्या शौर्याची दखल घेत त्यांना ‘शौर्य चक्र’ जाहीर करण्यात आले आहे.

Story img Loader