सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसचे हारूण शिकलगार व उपमहापौरपदी विजय घाडगे यांची शनिवारी निवड झाली. काँग्रेसने या निवडीत तब्बल ८ जादा मते मिळवीत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविले असून राष्ट्रवादी व स्वाभिमानी विकास आघाडीतही पदाधिकारी निवडीवरून फूट पडल्याचे मतदानावरून स्पष्ट झाले.
शनिवारी नूतन महापौर व उपमहापौर निवडीसाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. महापौर पदासाठी काँग्रेसचे शिकलगार, राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या स्वरदा केळकर यांच्यात तिरंगी लढत झाली. तसेच उपमहापौरसाठी काँग्रेसचे विजय घाडगे, राष्ट्रवादीचे राजू गवळी व विकास आघाडीच्या स्वरदा केळकर यांच्यात तिरंगी लढत झाली.
या महापौर व उपमहापौर पदासाठी काँगेसला ४९, राष्ट्रवादीला २३ आणि विकास आघाडीला ५ मते मिळाली. प्रत्यक्षात महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ ४२ असताना विरोधकांची व अपक्षांच्या मतांची बेरीज करीत काँग्रेसने तब्बल अतिरिक्त ७ मते पटकावली. ही मते विकास आघाडीतील असून स्वरदा केळकर यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य असलेल्या कूपवाड विकास आघाडीची दोन मते मिळवीत राष्ट्रवादीचे संख्याबळ दोनने कमी केले.
या निवडी वेळी जेष्ठ सदस्य सुरेश आवटी यांनी बंडाचा पवित्रा घेत मुलगा निरंजन आवटी यांना मदानात उतरविले होते. मात्र काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारत कारवाईचा मार्ग न अवलंबता चच्रेतून मार्ग काढीत आवटी यांची समजूत काढली. उर्वरित अडीच वर्षांत तिघांना संधी देण्याच्या कमिटमेंटवर बंडखोरी मोडीत काढीत विरोधकांमध्येच फूट घडवून मताधिक्य वाढविले.
महापौर व उपमहापौर निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका आवारासह काँग्रेस कमिटीसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. निवडीनंतर महापौर शिकलगार यांनी आपण विकासकामात विरोधकांचे सहकार्य घेत चांगला कारभार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसचे हारूण शिकलगार
सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसचे हारूण शिकलगार व उपमहापौरपदी विजय घाडगे यांची शनिवारी निवड झाली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 07-02-2016 at 02:20 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harun shikalgar of congress mayor of sangli