कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या सुरू असलेल्या १०० कोटी खर्चाच्या रस्ते प्रकल्पावरून शहरात जोरदार चर्चा सुरू असताना शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा बँक संचालक समवीत स्पेन परदेश दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आज चांगलेच कान टोचले. रस्ते प्रकल्पाबाबत कृती समितीचे म्हणणे आणि सूचना जाणून घ्याव्यात. तसेच, या कामांमध्ये तातडीने प्रगती करा, अशा सक्त सूचना दिल्या. या रस्ते प्रकल्प कामाची वस्तुस्थिती जशीच्या तशी जनतेसमोर येऊ द्या, असेही मंत्री मुश्रीफ यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बजावले आहे.

हेही वाचा – कोल्हापूरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई

शिवसेनेच्या इशाऱ्याची दखल

मिरजकर तिकटी येथे ५ महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत १०० कोटी रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ करत दर्जेदार व गुळगुळीत रस्ते देण्याची भिमगर्जना केली होती. पण आजतागायत कोल्हापूरकरांचा खड्ड्यातून प्रवास करण्याचा वनवास संपला नाही. याला पूर्णपणे नियोजनशुन्य व निष्क्रिय कोल्हापूर महापालिका प्रशासनाबरोबरच पालकमंत्रीसुद्धा जबाबदार आहेत. पालकमंत्र्यांनी कोल्हापूर शहरवासीयांना स्पष्टीकरण द्यावे की, आपण रस्ते कामाचा शुभारंभ करण्याचा आट्टाहास कोणाच्या हट्टापायी, कशासाठी केला? जर का रस्ते करण्यापूर्वीची महापालिकेची उपाययोजनाच तयार नव्हती. तर मग एवढ्या गडबडीत शुभारंभ कशासाठी व कोणाला खुष करण्यासाठी केला? भविष्यात आपले सरकार पडेल आणि आपल्या व आपल्या सरकारमधील सहकाऱ्याच्या हातून ठेकेदाराकडून सर्व काही मिळणारा मानसन्मान मिळणार नाही, या भितीपोटी आपण शुभारंभ केला का? असा प्रश्न शिवसेनेने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उद्देशून ठाकरे सेनेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी केला होता. याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घ्यावी लागल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – इचलकरंजीत अस्वच्छतेचे साम्राज्य; आंदोलकांकडून अधिकारी धारेवर

मुश्रीफ आयुक्त, अधिकाऱ्यांवर पुन्हा तापले

यापूर्वी याच प्रश्नावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रशासनावर डिसेंबर महिन्यात भलतेच तापले होते. महापालिकेच्या जाहीर कार्यक्रमात मुश्रीफ यांनी आपल्याला कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबले आहे का? दिवाळीपूर्वी खड्डे बुजवण्याचे सांगूनही ते का झाले नाही? आयुक्तांना प्रशासक राहण्यात रस आहे की जिल्हाधिकारी होण्यात आहे हे मला माहीत नाही. रस्ते नीट नसल्याने नागरिक पालकमंत्र्यांवर टीका करत आहेत, अशा शब्दात पालकमंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच खरडपट्टी केली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif active from abroad question to kolhapur municipal commissioner and city engineer regarding road project ssb
Show comments