कोल्हापूर : अतिक्रमणाच्या जंजाळात अडकलेले कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर ) मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी शनिवारी दोन दिवसात हे अतिक्रमण हटवले जाईल, असे उत्तर दिले. त्यावर लगेचच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसात हे अतिक्रमण हटवता आले नाही तर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घ्या, असा सल्ला देतानाच यासाठी दुसरी योजना राबवण्याचे सूतोवाच केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाची दुसऱ्यांदा जबाबदारी घेतल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी आज सीपीआर रुग्णालयामध्ये कामांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे अकराशे खाटांचे काम अद्याप सुरू झाले नाही. या संदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.
हेही वाचा >>>कोल्हापुरातील सहकार, शिक्षणाचे डॉ. मनमोहन सिंग यांना आकर्षण
सीपीआर रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आला असून त्यावर कारवाई केली जाईल. मी असेपर्यंत कोणालाही अभय मिळणार नाही. विशाल एंटरप्राइजेस संदर्भात समिती नेमली असून चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
दीपावली पूर्वी सीपीआर रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदललेला असेल, असे स्पष्ट करून मुश्रीफ यांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल, असे एका प्रश्नावेळी सांगितले.