कोल्हापूर : किल्ले पन्हाळा गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पन्हाळा गडावरून केली. शिवाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीसाठी प्रेरणादायी व्हावा यासाठीच हा अट्टाहास असल्याचेही, मुश्रीफ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पन्हाळा गडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वराज सप्ताहाअंतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते.

हेही वाचा – कोल्हापूर : पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून कागलच्या रंगमंचावर अवतरली शिवसृष्टी

पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोन्हीही लोकराजांनी प्रसंगी आपल्या खजिन्यातून जनतेचे हित जोपासले. त्यामुळे शिवाजी महाराज यांची ३५० वर्षांनंतर तर शाहू महाराज यांची १५० वर्षांनंतरही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो आहोत. त्यांचा जयजयकार करतो आहोत. हेच स्वराज्य यावे, अशाच जनतेच्या मनोमनी अपेक्षा असाव्यात.

इतिहासाला उजाळा

पालकमंत्री मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनिती, युद्धनीती, स्वभावगुणासह अनेक ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. ईतर वक्त्यांनीही आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशिद, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर यांच्याही इतिहासाला उजाळा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलले होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसूर्लेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे, मधुकर जांभळे, पन्हाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष धुमाळ, गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगुले, आदीप्रमुख उपस्थित होते.

कागलमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहेत. ही शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूया, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. येथील बसस्थानकाजवळच्या अश्वारूढ पुतळा परिसरात प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, जल व दुग्धाभिषेक व जन्मसोहळा हे कार्यक्रम उत्साहात झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फाउंडेशनने आयोजन केले होते. निपाणी वेस येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेत बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जल्लोषी सवाद्य मिरवणूक निघाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने कागल शहर दुमदुमले.

भाषणात मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना अशा सर्वच समाजघटकांना आपलं वाटावं असे अठरापगड जातींचे रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले. हे राज्य स्थापन करताना त्यांना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद, मदारी मेहतर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळेच पावणेचारशे वर्षाहून अधिक काळ समाज त्यांच्या विचारांच्या आणि कर्तुत्वाच्या पालख्या वाहत आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित, वळीवडेत मृत मासे नेण्यासाठी गर्दी; नदी प्रदूषणावरून संताप

सकाळी दहा वाजता शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीपुढे हातात शिवज्योत घेतलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते.

निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक पुढे गैबी चौक, पोलीस स्थानक, खर्डेकर चौक, कोल्हापूर वेस कमानीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. मिरवणुकीवर ठीकठिकाणी फुलांचा वर्षाव होत होता. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ जय शिवाजी”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.

स्मारक आणि पुतळे

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, किल्ले पन्हाळगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्वास होता. पन्हाळगडावर शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारू. तसेच; सामानगडावर पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारू. कागल बस स्थानकाजवळ १५ वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा सरकारच्या कडक नियमामुळे चबुतऱ्याच्या तुलनेत लहान झालेला आहे. या ठिकाणीही महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारू.

प्रवीण काळबर यांनी स्वागत केले. संजय चितारी यांनी आभार मानल. यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार अमर वाकडे, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif announced that a full length statue of shivaji maharaj will be erected at panhalgad ssb
Show comments