कोल्हापूर : जनमाणसांचा रेटा बघून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला आहे. त्याची अधिसूचना घेऊन मी आलो आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केले. कागल येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अधिसूचनेची प्रत शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्द केली.
निवडणुकीला दोन महिने बाकी असताना घाटगे यांनी धाडसी निर्णय घेऊन मला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी माझ्याकडे केली होती, असा उल्लेख करून मुश्रीफ म्हणाले, की त्यांचा आदेश व जनमाणसांचा रेटा बघून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय १५ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना घेऊन आज मी आलो आहे, असे नमूद करून मुश्रीफ यांनी अधिसूचनेची प्रत संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष व मुश्रीफ यांचा जयघोष केला.