महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागू होणार आहे. २० कोटींच्या निधीचे वाटप निवडणुकीपूर्वी होणे अशक्य असताना केवळ फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या निधीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यातून विकासकामे करणे अपेक्षित आहे. परंतु, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजप करत आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. शासकीय विश्रामधाम येथे तोडफोड केल्याचा आरोप खोडसाळपणाचा असून, तसा कोणताही प्रकार झाला नसल्याची स्पष्टोक्ती शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केली.
मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री पारदर्शकपणे काम केले असे म्हणतात, परंतु त्यांच्या कथनी व करणीमध्ये फार मोठा फरक आहे. राष्ट्रवादीच्या महापौर माळवी या लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती, परंतु पालकमंत्र्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणा-यांनीच महापौरांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांचे पाठबळ हे भ्रष्टाचारी कारभाराला असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. त्यामुळे जनता त्यांना या निवडणुकीमध्ये सहकार्य करणार नाही. महापालिकेत सत्तेवर असताना गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे एक हजार कोटींचा निधी खेचून आणला, मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील २० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची टिमकी वाजवत आहेत. ते त्यांनी बंद करावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif criticises bjp about fund planning