शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी चालवली आहे. सोमवारी एका बैठकीत त्यांनी याबाबतची भूमिका व्यक्त केली. कागलमध्ये १९ रोजी शिवजयंती व १७ रोजी अजित पवार यांचा कागल दौरा बाबत नियोजन बैठक आयोजित केली होती. यावेळी हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले. अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.
हेही वाचा >>> कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २२ फेब्रुवारीला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन – राजू शेट्टी
अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ मॅसाहेब या बगीचाचे लोकार्पण, कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) पुतळा सुशोभीकरण, श्री. राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी शेतकरी, युवक व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्या लोकसभा निवडणुक तयारीचा फायदा होईल – चंद्रकांत पाटील
कागलमध्ये भगवे वादळ
रविवारी शिवजयंती दिवशी शिवज्योतीचे आगमन, स्वागत, मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणुक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला जल- दुग्धाभिषेक, नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, गडकोट संवर्धनासाठी आणि इतिहास प्रसारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा सत्कार, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकांच्या २५ हजार प्रतींचे वाटप, सायंकाळी छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य विद्युत रोषणाई, लेसर शो असे कार्यक्रम होणार आहेत. कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची अपूर्व उपस्थिती लाभेल. त्यादिवशी कागल शहरात भगवे वादळ येईल आणि डोळ्याचं पारणं फिटेल, असेही मुश्रीफ म्हणाले.